जेव्हा अजित पवार स्वतः खाली वाकून गोणपाट सरकावून कामाचा दर्जा तपासतात, म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देऊन त्याची पाहणी करणे, ते काम योग्य पद्धतीने सुरु आहे का याची वेळेवेळी चौकशी करणे, अशा अनेक गोष्टींमध्ये अजित पवार बारकाईने लक्ष घालत असतात. त्याचा प्रत्यय आज (रविवार) पुन्हा एकदा आला आहे. आज भल्या पहाटे अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत अजित पवार यांनी शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांना अचानक भेटी दिल्या. दिवस उजाडत असतानाच अजित पवार यांचा ताफा निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या सुरु असलेल्या कामावर आला.

अजित पवार यांनी कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. मात्र, शेजारी केलेल्या पायऱ्याच्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पायऱ्यांवर सिमेंटच्या कामाला ओल रहावी यासाठी गोणपाट झाकून ठेवली होती. अजित पवार यांनी स्वत:च खाली वाकून गोणपाट दूर करुन कामाचा दर्जा तपासून पाहिला. या पायऱ्या व्यवस्थित सिमेंटने भरल्या गेल्या नसल्याचे त्यांना दिसून आले. ही बाबत त्यांना खटकल्यानंतर त्यांनी उपस्थित कंत्राटदाराला आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना भल्या पहाटे धारेवर धरत खडे बोल सुनावले.

अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु बांधकामातील खडा न खडा माहिती असलेल्या अजित पवार यांचे काही समाधान झाले नाही. मला काम दर्जेदार लागते याची माहिती असतानाही असे काम केले तर खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबीच त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला देयला ते विसरले नाहीत. अजित पवार यांनी जाहिर सभेत या संदर्भात माहिती देत जनतेच्या पैशातून जी विकासकामे होतात त्याचा दर्जा चांगला राहायला हवा, त्यामुळे मी स्वत: कामावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन कामाचा दर्जा तपासतो असे सांगितले.