धक्कादायक ! उपमुख्यमंत्र्यांच्या फोनवरून रात्री गेला अश्लील व्हिडीओ, म्हणाले – ‘कोणी हॅक केला फोन ?’

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सोमवारी राज्य सायबर सेलला दिलेल्या तक्रारीत त्यांचा मोबाइल फोन हॅक झाल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी आपल्या फोनवरून व्हॉट्सॲप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप पाठवण्यात आल्याचा दावा केला आहे. चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले की, हा व्हिडीओ पाठवण्यात आला तेव्हा ते झोपले होते. या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चंद्रकांत कवळेकर यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ही क्लिप त्यांच्या फोनवरून व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवली गेली होती. ते म्हणाले, काही समाज कंटकांनी ‘Villages of Goa’ या ग्रुपवर व्हिडीओ पाठवला.

कठोर कारवाईची मागणी
हा व्हिडीओ फक्त एका ग्रुपमध्ये पाठवण्यात आला आहे. जेव्हा हा मेसेज पाठवण्यात आला तेव्हा मी झोपलो होतो. काही दिवसांपासून माझे नाव बदनाम करण्यासाठी आणि खोटी प्रतिमा लोकांसमोर आणण्यासाठी असे अनेक प्रयत्न केले जात आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांना लिहिले की, माझ्या मोबाईल फोनमध्ये छेडछाड करुन अश्लील व्हिडीओ पाठविणाऱ्यां सर्वांवर कारवाई करण्याची मी मागणी करतो.

विरोधकांची कवळेकरांविरोधात तक्रार
दुसरीकडे विरोधी पक्षाने उपमुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. सोमवारी पहाटे 1.20 वाजता व्हाट्सॲप ग्रुपवर अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप केल्याने गोवा काँग्रेसने कवळेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिलांनी केलेल्या तक्रारीत कवळेकर यांच्या विरोधात एफआयआरची मागणी केली आहे.