चाहत्यांकडून देण्यात आलेला पुष्पगुच्छ कोरोनाच्या भीतीने अजित पवारांनी नाकारला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठक सुरु होण्यापूर्वी अजित पवारांना त्यांच्या एका चाहत्यांकडून एक पुष्पगुच्छ देण्यात येत होता. परंतु, त्यांच्या एका वेगळ्या आणि खास शैलीत भाष्य करत अजित पवारांकडून तो पुष्पगुच्छ नाकारला गेला.

बैठक सुरु होण्याअगोदर विधानभवन येथील परिसरात ऑक्सिजन सिलेंडर, कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी चारचाकी वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमास थोडेच लोक उपस्थित होते. त्यावेळी अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान त्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून एकजण अजित पवार यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी समोर आला. दादा तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे, त्यावेळी अजित पवारांनी कोरोनाच्या संकटामुळे हा पुष्पगुच्छ घेण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा पवार म्हणाले, काय करतो आता, अरे, बाबा काहीतरी नियम पाळा. कोणाकडून हा गुच्छ आणला. त्याला कोरोना होता का नाही, काय माहिती नाही काय नाही, जर काळजी घ्या, असे म्हणत फोटो काढण्यापुरता त्या पुष्पगुच्छाला हात लावून पवार तेथून निघून गेले.

या दरम्यान, अजित पवारांनी आज शुक्रवारी पुण्यातील विधानभवन येथे साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठीकीदरम्यान यावेळी लसीसंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी अगदी मिश्कील शब्दामध्ये एक टोलाही लगावला. “इतरांनी फोटो टाकल्यानंतर अनेकांनी ती लस घेतली. मी जर लस घेताना फोटो काढला असता तर जे लस घेणारे आहेत त्यांनी पण लस घेतली नसती, असे पवारांनी म्हणताच सर्वात हशा पिकली.