दुय्यम निबंधक अधिकारी 5 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील दुय्यम निबंधक अधिकाऱ्यासह दोघांना 5 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे.

कुंडलिक कोमल राठोड (वय 30) व एजाज खान बिस्मिल्ला खान (वय 34) असे रंगेहात पकडण्यात आलेल्याची नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यातील तक्रारदार यांचे मोठेवडील यांच्या नावाने असलेल्या जागेपैकी १/३ हिस्सा तक्रारदार व त्यांचे चुलतभाऊ यांच्या नावाने करायचा होता. त्यासाठी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान लोकसेवक राठोड हे येथे प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी आहेत.

तर खान हा खासगी दस्त लेखक आहे. हिस्सा नावावर करून देण्यासाठी राठोड यांनी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली असता त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत तक्रारदार व त्यांचे मामे भाऊ यांच्याकडून दुय्यम निबंधक कार्यालयतच खान याने राठोड यांच्या उपस्थितीत त्यांच्या वतीने 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.