मुलींमध्ये राज्यात प्रथम येऊनही उपजिल्हाधिकारी पर्वणी पाटील झाल्या ‘ट्रोल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 2019 वर्षाचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये सध्या उपजिल्हाधिकारी असलेल्या पर्वणी पाटील राज्यात मुलींमध्ये पहिल्या आल्या. मात्र आता त्यांना ट्रोल केलं जात आहे, त्यांनी पुन्हा परीक्षा दिल्यामुळं. काहींच्या मते प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा परीक्षा दिली, तर काहींच्या मते उच्च पदाचा हव्यास असं म्हटल जात आहे. मात्र पर्वणी पाटील यांनी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली असून यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितले आहे. पर्वणी पाटील यांनी सांगितले की, दोन वेळा एकाच पदावर निवड होणं हा माझ्यावरचा अन्याय आहे. पर्वणी पाटील या नागपूर येथे परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी दिलेल्या परीक्षेत त्या राज्यात महिलांमध्ये तिसरा क्रमांक आला होता. त्यामुळे त्यांच्यावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे सगळं केल्याचे बोलले जात आहे.

पर्वणी पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट केली असून या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 2017 मध्ये तहसीलदार म्हणून निवड झाली. 2017 च्या परीक्षेचा निकाल खरं तर 2018 च्या अखेरीला लागला. त्यामुळं निवड झालेल्या सर्वांचे ट्रेनिंग उशीरा झाले. आक्षराचा घोळ सुरु असल्यामुळं जॉइनिंग उशिरा झाली. परिणामी 2017 मध्ये तहसीलदार पद मिळालं. म्हणून उपजिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या पर्वणी यांनी 2018 मध्ये पुन्हा परीक्षा दिली. त्यावेळी त्यांनी उपजिल्हाधिकारी पदासाठी अर्ज केला होता. मात्र 2018 च्या मुख्य परीक्षेत त्यांना समाधानकारक गुण मिळाले नाहीत.

यानंतर त्यांनी 2019 मध्ये पूर्वपरीक्षा दिली. यात मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरल्या. यावेळीही त्यांनी केवळ उपजिल्हाधिकारी पदाला प्राध्यान्य दिलं होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या निकालानं सर्वांच नशीब बदललं. मुलींच्या आरक्षणा संदर्भातील एका निकालामुळं पर्वणी पाटील या तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी झाल्या.

मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. कारण काही उमेदवारांनी या निर्णयाविरुद्ध कोर्टात दाद मागितली. त्यामुळे त्यांचे पद जर तरमध्ये अडकलं. त्यामुळं त्यांना हे पद जाण्याची भीती होती. 2019 च्या मुलाखतीआधी त्यांच्या घरी कोर्टाची नोटीस आली. मात्र पर्वणी यांनी या सगळ्याचा सामना करत अभ्यासाच्या जोरावर हे पद मिळवलं. परंतु त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे.