मॅटच्या दणक्यानंतर आयुक्तांकडून ‘त्या’ महिला उपायुक्तांची बदली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – कार्यकाळ संपला नसतानाही बदली करण्यात आल्याने पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी मॅट न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती. मॅट न्यायालयाने नम्रता पाटील यांच्या बाजूने आज निकाल दिला आहे. मॅटच्या निर्णयानुसार नम्रता पाटील यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्त करण्याचे आदेश आज पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिले.

मॅटच्या दणक्याने आज पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली केली आहे. नम्रता पाटील यांचा कार्यकाळ संपला नसतानाही मुख्यालयात बदली करण्यात आली होती. या विरोधात त्या मॅटमध्ये गेल्या होत्या.

आज पोलीस आयुक्तांनी त्यांच्या बदलीचे आदेश काढून त्यांची पूर्वीच्याच ठिकाणी बदली केली आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची मुख्यालयातून परिमंडळ -२ च्या पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.