कृषी उपसंचालक 1 लाख रुपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विविध कंपन्याच्या एक्सपोर्टससाठी लागणारे फायटो सर्टीफिकेट (पीएससी) देण्याच्या मोबदल्यात 1 लाखाची लाच घेताना कृषी उपसंचालकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

कृषी उपसंचालक नरेंद्रकुमार गोविंदराव आघाव असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार नाशिक कार्यालयात फायटो सर्टीफिकेट मिळवून देण्याचे काम करतात. दरम्यान तक्रारदार यांनी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय, नाशिक येथे कृषी उपसंचालक आघाव यांना भेटले असता, तुम्ही फायटो सर्टीफिकेटस् (पीएससी) दिले आहेत सदर दिलेल्या फायटो सर्टीफिकेटसच्या मोबदल्यात प्रत्येक सर्टिफिकेट पाचशे रुपयांप्रमाणे एकुण 1 लाख 64 हजार 500 रुपये द्यावे अशी मागणी केली असता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तक्रार दिली. सदर तक्रारीवरुन ला.प्र.वि नाशिक पथकाने पडताळणी करुन सापळा रचून आघाव यांना लाचेच्या 1 लाख 64 हजार 500 रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपयाची लाच जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय नाशिक येथील आरोपीच्या कक्षामध्ये घेताना रंगेहात पकडले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.