50000 लाच स्विकारताना महावितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्यासह सहाय्यक अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळ्यात’

धुळे (शिरपूर) : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरण कंपनीच्या कामांच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी वेळोवेळी लाचेची मागणी करणाऱ्या उप कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंत्याला लाच स्विकाराताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. उप कार्यकारी अभियंता सुदर्शन गुलाबराव साळुंखे याला 50 हजार तर सहाय्यक अभियंता स्वप्नील अशोक माळी याला 21 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (शुक्रवार) शिरपूर उपविभाग -१ येथील उप कार्यकारी अभियंता यांच्या दालनात करण्यात आली.

तक्रारदार हे इलेक्ट्रीक ठेकेदार असून त्यांची फर्म आहे. नवीन इलेक्ट्रीकल्स लाईन टाकणे, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर बसविणे, जुनी लाईन शिफ्ट करणे अशी कामे ते करतात. या कामांची मंजुरी, अंदाजपत्रक, मंजुरी देण्याचे काम सहायक अभियंता स्वप्निल माळी आणि उप कार्यकारी अभियंता साळुंखे यांच्या मार्फत होत होते. त्यामुळे साळुंखे आणि माळी हे दोघे तक्रारदाराने केलेल्या कामांच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी आणि बिल मंजुर करण्यासाठी वेळेवेळी लाचेची मागणी करुन लाच घेत होते. सहाय्यक अभियंता माळी हा उप कार्यकारी अभियंता साळुंखे यांच्याकरिता मध्यस्थी करून लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) पडताळणी केली असता साळुंखे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेच्या रक्कमेचा 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना साळुंखेला रंगेहाथ पकडले. तर माळी याने 30 हजार रुपयांची लाच मागून 21 हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मनजितसिंग चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, संदीप कदम, प्रकाश सोनार, भुषण खालाणेकर, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com