Solapur News : उपमहापौर काळेने फरार असतानाच केला अटकपुर्वसाठी अर्ज, पोलिस पथके पुणे, पंढरपुरमध्ये तळ ठोकून

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिका उपायुक्तांना शिवीगाळ करुन खंडणी मागितल्याप्रकरणी उपमहापौर राजेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून ते अद्यापही फरार आहेत. सायबर पोलीस ठाण्याकडील तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस त्यांचा कसून शोध घेतला जात असून, पुणे व पंढरपूर परिसरात पोलिसांचे पथके तळ ठोकून आहेत. दरम्यान, काळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

२९ डिसेंबर २०२० रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात महापालिकेचे उपायुक्त डॉ. धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार आहेत. यापूर्वीही, येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यात काळे यांचा अटकपूर्व जामीन झाला असून, सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात काळे अजूनही फरार आहेत. आयुक्तालयातील सायबर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांचे लोकेशन शोधण्याचे काम सुरु आहे.

याबाबत शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे म्हणाले, गुन्हा दाखल झाल्यापासून काळे हे फरार असून, पोलिसांकडून तंत्रज्ञानाच्या मदतीने काळे यांचा शोध सुरु आहे. लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात येतील.

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी काळे यांनी ऍड. अजमोद्दीन शेख यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने सरकारी पक्षाचे मत सादर करण्याचे निर्देश आहेत. पुढील सुनावणी ६ जानेवारीला होणार आहे.