पीडितेवरील हल्ल्याची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल, पोलीस महासंचालकांस पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबई येथील वाशी रेल्वेच्या पुलावर एका तरुणीला रेल्वेतून खाली फेकून देण्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली. यात पिडीत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून जबर मारहाण केल्याबाबतचा गुन्हा रेल्वे पोलिसांनी केला आहे. या घटनेची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ( Deputy Speaker of the Legislative Council Dr. Neelam Gorhe ) यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली आहे.

यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच, पोलीस महासंचालकांना पत्र लिहून मदत आणि समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच डॉ. गोऱ्हे यांनी आरोपीला तातडीने पकडण्याचे निर्देश दिले आहेत.

पीडित मुलीवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून ती बेशुद्ध अवस्थेत असल्याने अद्याप जबाब घेतला नाही. तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे सेनगावकर यांनी डॉ. गोऱ्हे यांना सांगितले. सेनगावकर व रेल्वे पोलिसांनी यांनी तत्परतेने केलेली कार्यवाही समाधानकारक आहे. तसेच पीडित तरुणीला मदत मिळण्याबाबत काही सूचना सेनगावकर यांना दिल्या असून पोलीस महासंचालकांना पत्रही पाठविण्यात आले आहे.

तसेच पीडितेला मदत मिळण्याबाबत मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव पोलिसांनी तात्काळ विधी व न्याय प्राधिकरण यांच्याकडे पाठविण्यात यावा. आरोपींला शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी यंत्रणेला आदेश द्यावेत. पिडीत तरुणीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन होण्यासाठी उचित कार्यवाही करावी. सदरील पीडितेच्या लढयात शिवसेना महिला आघाडी आणि स्त्री आधार केंद्रच्या कार्यकर्त्या त्यांना न्यायालयीन मदत, सामाजिक स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

उपसभापती कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांनी देखील घटनेचा तपशील जाणून हॉस्पिटल येथील डॉक्टरांशी संवाद साधून डॉ. गोऱ्हे यांच्यावतीने पीडितेच्या तब्येतीची चौकशी केली आहे.