कोल्हापूरात मद्यधुंद पोलिसांनीच पोलीस उपअधीक्षकाला केली ‘धक्काबुक्की’

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करीत बसलेल्या पोलिसांना हटकणार्‍या शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह दोघा पोलिसांना पोलिसांनीच शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपअधीक्षकांवर पोलिसांनीच हात उगारल्याचे समजल्याने कोल्हापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी महामार्ग पोलीस दलाच्या दोघा पोलिसांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उप अधीक्षक चव्हाण यांचे अंगरक्षक प्रविण पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार शाहुपुरी पोलिसांनी महामार्ग पोलीस कर्मचारी बळवंत शामराव पाटील (वय ५१ रा. पोलीस मुख्यालय, कोल्हापूर), राजकुमार शंकर साळुंखे (वय ५३ रा. बेडेकर प्लाझा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यासह जितेंद्र अशोक देसाई (वय ३६, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) यांच्यावर रविवारी सकाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण हे दोन कर्मचार्‍यासह शनिवारी मध्यरात्री रात्र गस्तीवर होते. त्यावेळी कसबा बावडा येथील शंभर फुटी रोड परिसरात उघड्यावर महामार्ग विभागाचे दोन कर्मचार्‍यांसह तिघे जण मद्य प्राशन करीत दंगामस्ती करत होते. यावेळी चव्हाण व त्यांचे अंगरक्षक पाटील यांनी त्यांना हटकले. मद्यधुंद पोलिसांनी त्यांच्याबरोबर वादावादी केली. वाद वाढत गेला. पोलिसांनी चव्हाण व पाटील यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार चव्हाण यांनी रात्रीच जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या कानावर घातला. बलकवडे यांनी संबधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात आजपासून रात्रीच्या वेळी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. असे असताना पोलीसच भर रस्त्यावर दारु पित बसत असल्याचे दिसून आले आहे.