चीननं बळकावला नेपाळचा 33 हेक्टरचा भूभाग, आणखी क्षेत्र बळकावण्याची शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान झालेल्या हिंसेनंतर काही दिवसांनंतर नेपाळ सरकारचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये चीन तिबेटमध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्यांचा वापर करुन नेपाळचा काही भूभाग बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले आहे. नेपाळच्या सीमा भागावर चीन लवकरच लष्करी छावणी उभारु शकते असा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आल आहे. त्यामुळे चीन आता नेपाळलाही डोईजड झाला आहे .

नेपाळमधील कृषी खात्याच्या अंतर्गत येणार्‍या जमीन मोजणीसंदर्भातील सर्वेक्षण खात्याने 11 ठिकाणांची यादीच अहवालामध्ये दिली आहे. या 11 पैकी 10 ठिकाणी चीनने 33 हेक्टर जमीन बळकावल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतकच नाही नेपाळच्या सीमेजवळची अधिक अधिक जमीन ताब्यात यावी यासाठी चीन नद्यांचा प्रवाह बदलत असल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. चीनने बळकावलेल्या एकूण जमीनीपैकी 10 हेक्टर जमीन ही हुमला जिल्ह्यातील आहे. येथे बांधकाम करण्यासाठी चीनने बगदारी खोला नदी आणि कर्नाली नदीचा प्रवाह बदलला आहे. तर रासुवा जिल्ह्यातील सहा हेक्टर जमीनीवर चीनने ताबा मिळवला आहे. तिबेटमधील बांधकाम करण्यासाठी नेपाळमध्ये येणार्‍या सीनजेन, भूर्जूक आणि जांम्बू खोला नदीचे पात्र बदलण्यात आले आहे.

चीन तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे निर्माण करत आहे. यामुळेच अनेक नद्यांचे मुख्य प्रवाह बदलले आहेत. प्रामुख्याने तिबेटमधून नेपाळमध्ये येणार्‍या नद्यांचे मुख्य प्रवाह बदलण्यात आल्याने याचा नेपाळवर परिणाम होणार आहे. बांधकामाच्या नावाखाली चीन अशाच पद्धतीने नद्यांचा प्रवाह बदलत राहिल्यास नेपाळच्या ताब्यातील जमीनीवर चीन ताबा मिळवू शकतो असंही म्हटलं आहे. नद्यांचे बदलले प्रवाह हे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ असून नद्यांचे प्रवाह बदलून नेपाळचा भूभाग बळकावण्याचा चीनचा कट असल्याचे संकेत या अहवालामध्ये दिले आहेत.