चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच ‘कोरोना’चा प्रसार, चीनचे विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली मेंग यांचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – चीनच्या वुहानमधील सरकारी प्रयोगशाळेत कोरोना विषाणू तयार करण्यात आला होता. त्यानंतर ती माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दडवून ठेवली, असा आरोप चीनच्या विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली मेंग यान यांनी पुन्हा एकदा केला आहे. चीन सरकारला कोरोना विषाणूच्या प्रसाराची सगळी माहिती होती. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याकडे दुर्लक्ष केले.

वुहानमध्ये पहिला उद्रेक झाला तेव्हा तेथे चौकशी करणार्‍यांत मेंग यांचा समावेश होता. वुहानमध्ये कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार केल्याचे प्रकरण दडपण्यात आले. चीन सरकारने हा विषाणू जाहीरपणे मान्य केला त्याआधीपासून त्याचा प्रसार त्यांना माहिती होता. वुहानमधील प्राण्यांच्या बाजारपेठेतून कोरोना पसरला ही चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने केलेली धूळफेक होती. प्रत्यक्षात चीन सरकारने सोशल मीडियावर माझी प्रतिमा या आरोपांमुळे मलिन करीत माझ्या कुटुंबीयांना धमकावले, असे त्यांनी सांगितले.

मेंग या हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे विषाणुशास्त्र विभागात काम करीत असताना वरिष्ठांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. बराच काळ ते कोरोना विषाणूवर संशोधन करीत आहेत. ‘हा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत विकसित केलेला आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चीनने काही केले नाही. पण तो प्रयोगशाळेत तयार केलेला होता याचे पुरावे आपल्याकडे आहेत’, असेही त्यांनी सांगितले आहे. चीनवर केलेल्या आरोपानंतर मेंग यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले. चिनी अधिकार्‍यांनी मारण्याची धमकी दिल्यानंतर आपण सुरक्षेसाठी अमेरिकेत आसरा घेतल्याचे त्यांनी सांगितले.