जेट एअरवेज’ला वाचवण्यासाठी कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा पुढाकार

लंडन : वृत्तसंस्था – कर्ज व तोटा अशा दुहेरी विळख्यात जेट एअरवेज सापडले आहे. भारतीय बँकांना ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यानं आता जेट एअरवेजला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जेट एअरवेजला वाचवण्यासाठी ट्विटरवरून आपले म्हणणे मांडले आहे. हवे तर माझे पैसे घ्या, पण जेट एअरवेजला वाचवा असं आवाहन विजय मल्ल्यानं केलं आहे.

मग बँका माझे पैसे घेत का नाहीत ? –

मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मी सांगू इच्छितो की, कर्ज फेडण्यासाठी माझ्या संपत्तीची माहिती मी कर्नाटक उच्च न्यायालयात दिली आहे. मग बँका माझे पैसे घेत का नाहीत. हेच पैसे वापरुन ते जेट एअरवेजला वाचवू शकतात’. जेट एअरवेज  सध्या २६ बँकांचे ८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये खासगी आणि परदेशी बँकांचा समावेश आहे. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओवरसीज बँक, अलाहाबाद बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून जेटला कर्ज देण्यात आले होते.

सरकारच्या दुट्टपी भूमिकेवर टीका –

गेल्या तीन महिन्यांपासून जेट एअरवेजला व्यापारात भरपूर तोटा झाला आहे. देशी-विदेशी बँकांकडून घेतलेलं कर्जही जेट एअरवेज पूर्णपणे फेडू शकलेलं नाही. अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत. अशा परिस्थितीत जेटच्या रुपाने किंगफिशरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका अशी हाक सरकारने सर्व बँकांना दिली होती. यामुळेच कर्ज देणाऱ्या २६ बँकांपैकी २ बँका जेटची मदत करण्यास तयार झाल्या आहेत. सरकारच्या या भूमिकेवर विजय मल्ल्याने दुट्टपी असल्याची टीका केली. ‘मी कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी किंगफिशर एअरलाइन्समध्ये ४००० कोटींची गुंतवणूक केली. पण त्याची अजिबात दखल न घेतला शक्य तितकी टीका माझ्यावर करण्यात आली. याच सरकारी बँकांनी भारतातील सर्वोत्कृष्ट असलेल्यांपैकी एका कंपनीला बुडू दिलं. एनडीए सरकारची दुटप्पी भूमिका’, असं विजय मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रचंड मोठं नुकसान झाल्याने २०१२ मध्ये किंगफिशर एअरलाइन्स बंद पडली.