Coronavirus : मास्क न परिधान करता डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मास्कच्या फॅक्टरीचा दौरा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसमुळे सध्या फेस मास्क अत्यंत महत्वाचा आहे. फैलाव रोखण्यासाठी चेहर्‍याला मास्क बांधणे आवश्यक आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कदाचित याचा विसर पडला असल्याचे दिसून आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी चेहर्‍याला मास्क न बांधताच एरिझोनामधील न्यू मेडिकल मास्क फॅक्टरीचा दौरा केला. नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एरिझोना प्रांतामधून मताधिक्क्य मिळेल अशी त्यांना आशा आहे.

जगभरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सुरक्षिततेला पृाधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे संसर्गापासून दूर राहण्यासाठी अमेरिकन नागरिक प्रवास करणे टाळत आहेत. दरम्यान, राजकीय रणनीती बनविण्यासाठी एरिझोना प्रांतातील फोनिक्स शहरामध्ये दुपारी दाखल झाल्यानंतर ट्रम्प यांनी हनीवेल इंटरनॅशनल फॅक्टरीला भेट दिली. आरोग्य कर्मचार्‍यांसाठी या फॅक्टरीमध्ये मास्क बनवले जात आहेत.

रोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना सुरक्षा उपकरणाची कमतरता निर्माण झाल्याने हनीवेल इंटरनॅशनल फॅक्टरीत एन 95 मास्क बनवण्याचे काम सुरु आहे. कोरोना व्हायरसच्या फैलावावर नियंत्रण मिळवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘अमेरिका आता कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईच्या पुढच्या टप्प्यात आहे. हा सुरक्षित टप्पा असून, हळूहळू काही गोष्टी सुरु होतील’ असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी अमेरिकन नागरिकांचे आभार मानले व असंख्य लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा केला.