दुर्देवी ! आई-वडिलांसोबत बस पकडण्यासाठी धावणार्‍या 6 वर्षीय मुलीला ट्रकनं चिरडलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आई-वडिलांसोबत बस पकडण्याचा प्रयत्न करत असताना एका सहा वर्षाच्या मुलीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात इटावाह-मैनपुरी सीमेवर किश्नी भागात ही घटना घडली. गुरुग्रामवरुन हे कुटुंब सीतापूर जिल्ह्यामध्ये चालले होते.

स्थलांतरित मजुरांसोबत हे कुटुंब एका ट्रकमध्ये बसले होते. ट्रकमधून उतरल्यानंतर त्यांना मैनपुरी सीमेवर थांबलेल्या एका बसमध्ये बसण्यास सांगण्यात आले. त्यावेळी अपघात घडला. मुलीचे पालक आणि काही नातेवाईक सोमवारी गुरुग्रामवरुन चालत निघाले होते. त्यानंतर त्यांना एका ट्रकमध्ये लिफ्ट मिळाली. मंगळवारी सकाळी इटावाह-मैनपुरी सीमेवर पोलिसांनी ट्रकला अडवले होते.

त्यानंतर बस पकडण्यासाठी आम्ही सामान घेऊन ट्रकमधून उतरत होतो, त्याचवेळी तिथून जाणार्‍या दुसर्‍या एका ट्रकने माझ्या मुलीला चिरडले असे तिच्या वडिलांनी सांगितले. मैनपुरी प्रशासनाने रुग्णवाहिकेची व्यवस्था केल्यानंतर मुलीचा मृतदेह घेऊन गावी जाणार आहेत. मुलीचे वडिल रोजंदारीवर काम करतात. लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे काम मिळत नव्हते. रोजच्या उत्पन्नावर आमचे घर चालते. गुरुग्राम रोजचा दिवस ढकलणे कठिण बनले होते. त्यामुळे आम्ही सीतापूरला आमच्या मूळगावी परतण्याचा निर्णय घेतला होता असे मुलीच्या वडिलांनी सांगितले