‘मी जन्माने मुस्लिम पण मला भारतीय असल्याचा अभिमान’

दिल्ली वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्या पत्नीबद्दल खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला दिनेश गुंडू राव यांच्या पत्नी तब्बू राव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी जन्माने मुस्लिम पण मला भारतीय असल्याचा अभिमान आहे असे वक्तव्य तब्बू राव यांनी केले आहे. गुंडू राव हे एका मुस्लिम महिलेच्या मागे धावणारे व्यक्ती आहेत, असे वक्तव्य अनंत हेगडे यांनी केले होते. त्यालाच तब्बू राव यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याबाबत पोस्ट केले आहे.

एका फेसबुक पोस्टमध्ये तब्बू राव म्हणाल्या की, “भाजपासाठी मी एक ‘सॉफ्ट टार्गेट’ बनली आहे. माझ्या पतीचा सामना करण्यात त्यांना अपयश येत असल्यामुळे ते मला लक्ष्य करत आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना अनंतकुमार यांनी मला उगाच या राजकीय चिखलफेकीत ओढले आहे.”

हेगडे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या की, “होय मी जन्माने मुस्लिम आहे. पण मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचाराचे स्वातंत्र्य, प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. आपले संविधान धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले आहे.” इतकेच नाही तर, “हेगडेंनी अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण केले आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्या पतीला राजकीय आव्हान द्यावे. गृहिणीच्या साडीचा वापर करून दगड फेकू नये” असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्य म्हणजे, केंद्रीय मंत्र्याच्या तोंडी अशा पद्धतीची भाषा शोभत नाही असे म्हणत,अनंतकुमार यांनी आपल्याला ट्विटरवर ब्लॉक केल्याची माहितीही त्यांनी दिली.

“कर्नाटकातील राजकारणी हे समजूतदार आणि सभ्य म्हणून ओळखले जातात. मी हेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी महिलांविरोधात चिथावणीखोर भाषणे देऊन आपल्या राज्याची प्रतिमा बिघडवू देऊ नका” असे तब्बू राव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.