पवारांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का ? असा सवाल त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना केला आहे.

यावेळी बोलताना विनोद तावडे यांनी पवारांच्या एका मुलाखतीचा संदर्भ दिला. ते म्हणाले “पवार एका मुलाखतीत म्हणले होते की, २००४ मध्ये मनमोहनसिग पंतप्रधान होतील हे कोणालाच वाटले नव्हते. कारण त्यांनी लोकसभा लढवली नव्हती. पण मनमोहन सिंग तेव्हा राज्यसभेवर होते. आणि ते अचानक पंतप्रधान झाले. यावरून आता शरद पवार हे देखील लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत. याचाच अर्थ शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे. बहुतेक ती त्यांनी बोलून दाखवली असावी”. असे म्हणत तावडे यांनी पवारांना टोला लगावला.

अशा घटना पक्ष खपवून घेणार नाही
भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात काल अंमळनेरमध्ये जी घटना घडली ती अतिशय चुकीची आहे. अशी घटना होणे, हे भाजपला शोभणारी नाही. या घटनेमागे काहीही आणि कोणतेही कारण असले, तरीही या पध्दतीची कुठलीही घटना पक्ष खपवून घेणार नाही, असं तावडेंनी नमूद केलं.