परिक्षेत निवड होऊनही 2 वर्षांपासून नियुक्तीच नाही म्हणून ऊर्जामंत्र्यांच्या नावाने मुंडण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता मराठा आरक्षण लागू केल्यानंतर सरळसेवा भरतीद्वारे परीक्षा देऊन, मुलाखत देऊन निवड झालेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यानी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान इंजिनिअर सचिन चव्हाण यांनी आपले मुंडण करुन राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सचिन चव्हाण यांनी इलेक्ट्रीकल्स विषयात आयटीआय पूर्ण केला. त्यानंतर इंजिनिअरिंगची पदवीही घेतली. मात्र, सरकारी नोकरी असल्याने महावितरणमधील जाहिरात पाहून आयटीआय पात्रतेवरुन असलेल्या उपकेंद्र सहायक पदासाठी अर्ज भरला. परीक्षा दिली, निकाल लागला, निकालाच्या यादीतून निवडही झाली. त्यामुळे, घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकियेमुळे नियुक्ती थांबली आहे. दोन वर्ष उलटूनही नियुक्ती न मिळाल्याने सचिन चव्हाण यांनी घरीच मुंडन करुन ऊर्जामंत्र्यांच्या नावाने निषेध व्यक्त केला आहे. मुंबईतील आझाद मैदानात 35 दिवस आंदोलन केले. त्यावेळी परिपत्रक घेऊन गेल की ते सर्वोच्च न्यायालयाचे कारण सांगायचे. आता, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. मात्र, राज्य सरकार पर्यायी मार्ग काढून ज्यांची निवड झाली आहे, त्यांना नियुक्ती देऊ शकते. पण, मंत्रीमहोदय केवळ बैठकाच घेत आहेत. आता 2 वर्षे होत येतील परीक्षा पास होऊन, पण राज्य सरकारला आमच काहीच पडल नाही. आम्ही पूर्णपणे हतबल झालो आहोत, अशा शब्दात सचिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देव करो आणि ऊर्जामंत्र्यांना, राज्य सरकारला आमची आठवण होवो असे त्याने म्हटले आहे.