सर्वोच्च न्यायालयाने 4 दिवसांपूर्वी दिला होता ‘हा’ आदेश, मग न्यायाधीशांनी चिदंबरम यांचा अर्ज का नाकारला ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया प्रकरणासंदर्भात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अर्जावरील तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी वारंवार या प्रकरणाची सुनावणी घेण्याची विनंती केली, मात्र न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांनी तातडीने या प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार दिला.

कपिल सिब्बल यांना चिदंबरम यांची अटक टाळण्याची इच्छा होती. त्यासाठी सिब्बल यांनी बुधवारी न्यायमूर्ती रमण यांना भूषण स्टीलचे माजी सीएफओ नितीन जोहरीविषयी दिलेल्या एका निर्णयाची आठवण करून दिली आणि म्हणाले की या आधारे त्यांनी तातडीने या खटल्याची सुनावणी घ्यावी. परंतु न्यायमूर्ती रमण यांनी त्यांचा युक्तिवाद नाकारला. न्यायाधीश रमण म्हणाले, ‘हे प्रकरण सूचीबद्ध न करताच मी यावर सुनवाई घेऊ शकत नाही.’

न्यायमूर्ती रमण हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आहेत. चार दिवसांपूर्वी म्हणजेच १६ ऑगस्ट रोजी त्यांनी यादी न लावता एका खटल्याची तातडीने सुनावणी केली होती.

काय आहे प्रकरण ?
हे प्रकरण भूषण स्टीलचे माजी सीएफओ आणि डायरेक्टर नितीन जोहरी यांच्याशी संबंधित होते. यावर्षी मे महिन्यात त्याला एसएफआयओने अटक केली होती. त्याच्यावर कंपनीच्या खात्यातील अनेक अफरातफरी तसेच आर्थिक फसवणुकीचा आरोप होता. परंतु तरीही १४ ऑगस्टला दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. यानंतर, १६ ऑगस्ट रोजी एसएफआयओने त्याचा जामीन कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायमूर्ती रमण यांनी या प्रकरणाची यादी न करताच सुनावणी केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –