‘हे’ गंभीर आजार असल्यासही शिक्षकांना मिळणार नाही इच्छेनुसार बदली

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दुर्धर आजार झाल्यास मुंबई महापालिका शाळेतील शिक्षकांना जवळच्या शाळेत बदली देण्यात येते. मात्र मेंदू विकार, मणक्याचे विकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या शिक्षकांना बदली देण्याचा प्रस्ताव महापालिकेने नाकारला आहे. वर्षभरापूर्वी शिक्षकांच्या बदलीसंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. मेंदूचे विकार, मणक्याचे विकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजारांचा शिक्षकांच्या बदली धोरणात समावेश करण्यास पालिकेने नकार दिला आहे.

मुंबई महापालिका शाळेतील अनेक शिक्षक दूरच्या ठिकाणाहून प्रवास करून येतात. दुर्धर आजार बळावल्यास त्यांना दूरचा प्रवास करणे त्रासदायक होते. अशा शिक्षकांना वैद्यकीय दाखला दिल्यास इच्छेनुसार जवळच्या शाळेत बदली दिली जाते. त्यामुळे मेंदूचा विकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या शिक्षकांनाही त्यांच्या घराजवळील शाळेत बदली मिळावी यासाठी शिक्षक सेनेचे अध्यक्ष के. पी. नाईक यांनी शिक्षण समितीला प्रस्ताव दिला. या आजारांचा शिक्षकांच्या बदली धोरणात समावेश करण्याची मागणी केली होती.

याबाबत नाईक यांनी सांगितले की, पालिकेच्या शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार ‘विशेष संवर्ग भाग १’ मध्ये शिक्षकांच्या ऑफलाईन बदल्या करण्याबाबत मार्गदर्शन तत्त्वे मंजूर केली आहेत. यात हृदय विकार आणि किडनीचे विकार वगळल्यास अन्य मणक्यांचे विकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि मेंदूविकार या मुख्य आजारांचा यात समावेश करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक पालिका शाळेतील शिक्षकांना नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे.

मुंबईचे वातावरण कोंदट आणि प्रदूषित आहे. त्यामुळे या ठिकाणी आजाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. ग्रामीण भागातील आजार आणि शहरी भागातील आजार यात तफावत असल्याने दोन्ही ठिकाणच्या शिक्षकांमध्ये समान धोरणे ठेवणे उचित नाही. याबाबत शिक्षक समितीला पत्र पाठवून शिक्षकांच्या बदली धोरणात मेंदूविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांचा समावेश करण्याची विनंती केली होती. पण पालिकेनं या विनंतीला गांभीर्यानं घेतले नाही, असे नाईक म्हणाले.