तरुण तेजपाल प्रकरणात तपास एजन्सीचे अपयश आरोपीच्या पथ्यावर पडले, अधिकाऱ्यांनी CCTV फुटेज नष्ट केलं, न्यायालयाचा तपास अधिकाऱ्यावर ठपका

पणजी : वृत्तसंस्था – ‘तहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांची एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कनिष्ठ महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून गोव्याच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. या प्रकरणात महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यात आल्याचा ठपका म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने तपास अधिकाऱ्यावर ठेवला आहे. ती फुटेज नसल्यामुळे पीडीत महिलेचा दावा सिद्ध करणारा पुरावा मिळत नसल्याचे निरीक्षणही न्यायाधीश क्षमा जोशी यांनी नोंदवले आहे.

7 ते 11 नोव्हेंबर मध्ये गोव्यातील बांबोळी येथील ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील लिफ्टमध्ये कथित बलात्काराचा प्रकार घडला त्या हॉटेलच्या 7 क्रमांक ब्लॉकमधील दुसऱ्या ब्लॉकवरील फुटेज उपलब्ध आहे. तसेच तळमजल्यावरील फुटेज आहे, मात्र पहिल्या मजल्यावरील फुटेज गायब आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. ही फुटेज का दिसत नाहीत याची चौकशी न केल्याने तसेच ती मिळवण्यासाठी सीएसएफलकडे प्रयत्न न केल्यामुळे ती तपास अधिकाऱ्यांनीच नष्ट केल्याचे दिसत आहे, असे आदेशात म्हटले आहे. क्राईम ब्रँचच्या सुनिता सावंत या प्रकरणातील तपास अधिकारी आहेत. आदेशामध्ये तपास अधिकारी कुठे कमी पडले याची यादी आदेशात नमूद करण्यात आली आहे.

व्हिडीओ रेकॉर्डिंग साक्षींना महत्त्व
या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूण 70 साक्षीदार, पीडितेची साक्ष, आरोपीने पाठवलेले माफीनाम्याचे ईमेल अशा साक्षी गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या साक्षींना अधिक महत्त्व दिले आहे. त्यानुसार ब्लॉक नंबर सातच्या पहिल्या मजल्यावरच्या लिफ्ट जवळील सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केला नाही. हे तपास एजन्सीचे मोठे अपयश असून, हेच अपयश आरोपीच्या पथ्यावर पडले आहे.

ते फुटेज गेले कुठे ?
सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांनी नष्ट केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, हा निष्कर्ष परिस्थितीजन्य घटनांच्या आधारावर न्यायालयाने काढला आहे. या प्रकरणातील सर्व डीव्हीआर क्राईम ब्रॅचने न्यायालयाच्या ताब्यात दिले होते. दुसऱ्या आणि तळमजल्यावरील कॅमेऱ्यातून टीपलेले रेकॉर्डिंग न्यायालयाला पाहणे शक्य झाले नाही. पहिल्या मजल्यावरील फुटेज पाहता येत नाही. ती नष्ट करण्यात आली असती तर मदरबोर्ड तपासल्यास ते सहज कळते असा तज्ज्ञांचा दावा आहे. तसेच ही फुटेज आठ वर्षे न्यायालयाच्या ताब्यात होती. इलेक्टॉनिक्स वस्तु अधिक काळ वापरले नाही तर ते निकामी होण्याची शक्यता असते. मात्र विशेष तांत्रिक सहाय्याने त्या पुन्हा वापरास लायकही करणे शक्य आहे. आता हे प्रकरण खंडपीठात गेल्याने सर्व डीव्हीआर वापरालायक करण्यासाठी तांत्रिक सहाय्य घेण्यास वाव आहे. तसेच रेकॉर्डिंग नष्ट केले असेल तर तसे करणाऱ्या संशयिताची चौकशी होऊ शकते. किंवा न्यायालय तसा आदेश देऊ शकते.