मतदानादरम्यान इव्हीएम मशीन फोडले, एकाला अटक

पटना : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीच्या ५ व्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. दरम्यान बिहारच्या सारण लोकसभा मतदारसंघात मात्र या मतदानाला गालबोट लागलं आहे. सोनपूर विधानसभेच्या नयागावातील १३१ नंबरच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडण्यात आल्याचा प्रकार घङला आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. रणजित पासवान असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मतदान प्रक्रिया खंडीत

सकाळी मतदानप्रक्रिया सुरु झाल्यानंतर सारण लोकसभा मतदासंघातील सोनपूर विधानसभा मतदारसंघातील नयागावमधील बुथ क्रमांक १३१ वर मतदान प्रक्रिया सुरु होती. त्यावेळी ईव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मतदान केंद्रावर इव्हीएम फोडल्याप्रकरणी रणजित पासवान याला अटक केली आहे. तर मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

बिहारमधील पाच मतदारसंघांमध्ये आज पाचव्या टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. सारण मतदारसंघातून महागठबंधनच्या उमेदवार चंद्रिका राय आहेत. तर एनडीएकडून राजीव प्रताप रुडी हे रिंगणात आहेत