कर्वेनगर भागात गाड्याची तोडफोड करणारे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या तिघाजणांनी मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर टिकाव, कुदळीने घाव घालून त्यांची तोडफोड केली होती. या तोडफोडीत ४ दुचाकी, १२ मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करुन दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पथकाने तिघांना अटक केली आहे.

मुख्य आरोपी महेश वसंत महाडिक (वय २४ रा.होम्स कॉलनी, कर्वेनगर, पुणे), राजेश दत्तात्रय थोरात (वय २३, रा.१९,सदाशिव पेठ, विसावी मारुती मंदिरा जवळ, पुणे), हर्षल सुनिल कंधारे, (वय २४, रा. होम्स कॉलनी, कर्वेनगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हिंगणे होम कॉलनीतील मिलेनियम शाळे जवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला नागरिकांची वाहने पार्क केली होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरुन तिघे जण आले. त्यांनी हातातील टिकाव व कुदळीने रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांवर घाव घालण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रामुख्याने चारचाकी वाहने लक्ष्य केली. अनेक वाहनांच्या काचा त्यांनी फोडल्या. एका महिला व पुरुषांनी हा प्रकार पाहिला. पण घाबरुन ते बाहेर येऊ शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मार्शल हे घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.

गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पथकाकडून गुन्हेगारांचा शोध घेत असताना आरोपी महेश महाडिक व राजेश थोरात हे हिराबाग चौकातील मल्हार हॉटेल शेजारील गल्लीत फिरत असल्याची माहिती पथकातील पोलीस नाईक सचिन ढवळे यांना मिळाली. मिळालेल्या पथकाने मल्हार हॉटेल शेजारील गल्लीत सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कारवाईसाठी  वारजे माळवाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख, प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक म्हेत्रे, सहायक पोलीस फौजदार शिंदे, गरुड, पोलीस हवालदार मनोळकर, पोलीस नाईक सचिन ढवळे, तारु यांच्या पथकाने केली.

जाहिरात