लोकसभा निवडणुक २०१९ : मातंग समाजाचे मत ठरणार निर्णायक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सर्वत्र लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मातंग समाजाने नकारार्थी मतदान करण्याचा निर्णय घेतला असून या समाजाच्या अशा निर्णयामुळे विरोधक व सत्ताधारी यापैकी कोणाला फटका बसणार व कोणाला फायदा होणार हे सांगणे अवघड आहे याबाबत बोलताना मातंग समाज समितीचे अध्यक्ष म्हस्कु शेंडगे म्हणाले की आज पर्यंत सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांच्याकडे विविध वेळा विविध स्वरूपाने आंदोलने मोर्चे काढून मातंग समाजाच्या मागण्या मागण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या मागण्या आंदोलने मोर्चे याचा कोणत्याच सरकारवर काहीही परिणाम न झाल्यामुळे आमच्यावर हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेला मातंग समाज असून सुद्धा या समाजाचा इतिहास या समाजाचं वास्तव कधीच पुढे आणण्याचा प्रयत्न झाला नाही. खरंतर लढवय्या क्रांतिकारी अशी या समाजाची ओळख मातंग ऋषी, संदीपान ऋषी,संत जनाबाई, लहुजी वस्ताद साळवे,मुक्ता साळवे , वीर फकीरा,अण्णाभाऊ साठे अशा सर्व ऋषी, संत, महात्मे, महापुरुषांचा गौरवशाली व स्वकर्तृत्वाचा इतिहास असणारा मातंग समाज तरीदेखील आज मातंग समाज हा इतर समाजापेक्षा उपेक्षितच आहे आज देखील या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात विद्येच माहेर घर म्हणून ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये मातंग समाजातील तरुणाला मानवी विष्ठा चालण्यासारखे अघोरी प्रकार होत आहेत.

जळगाव जिल्ह्यामध्ये पोहायला गेलेल्या मुलांवर झालेला अत्याचार त्यांची नग्न करून काढलेली धिंड अशा प्रकारे विविध भागांमध्ये विविध ठिकाणी अत्याचार झाले आहेत तर अ.,ब.,क., ड.प्रमाणे स्वतंत्र आरक्षण भूमिहीनांना जमीन व मातंग समाजातील तत्सम पोटजातींना जातीचे दाखले मिळावेत,अण्णाभाऊ साठे महामंडळाची सरसकट कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावेत ,मातंग समाजावरील होणाऱ्या अत्याचाराच्या निर्मूलनासाठी स्वतंत्र आयोग नेमावा ,लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करण्यात याव्यात,मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे,संगमवाडी लहुजी वस्ताद स्मारकाचे काम करावे या प्रमुख मागण्या असल्याचे यावेळी म्हस्कु शेंडगे यांनी सांगितले तर या मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातील संजय ताकतोडे या युवकाने जलसमाधी घेऊन सुद्धा सत्ताधारी सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर विरोधकांनी सुद्धा या विषयावर कुठेही आवाज काढला नाही अशाप्रकारे मातंग समाजाला जाणून-बुजून वंचित ठेवण्याचे काम सत्ताधारी व विरोधक करत आहेत म्हणून समाजातील सर्व समाज बांधवांना यावेळी नकारार्थी मतदान करण्याचे आवाहन म्हस्कु शेंडगे यांनी केले.