12 आमदारांपेक्षा ‘कोविड’च्या रुग्णांची काळजी करा, फडणवीसांचा राऊतांना टोला

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन –   शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता 12 आमदारांच्या नियुक्तीची काळजी करु नये. त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची काळजी घ्यावी. हे रुग्ण कसे बरे होतील, त्याकडे लक्ष द्यावे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. त्यांनी कोविड पेशंटला उपचार मिळत नाही, त्यांचे काय होणार ? यासंबंधी प्रश्न विचारला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं, हा विषय डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर केली आहे. देवेंद्र फडणवीस हे आज कल्याण दोऱ्यावर होते. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राऊतांना लक्ष्य केलं.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावर आज (रविवार) देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत यांनी 12 आमदारांची चिंता करू नये, त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावा, त्यापेक्षा त्यांनी कोविड पेशंटला उपचार मिळत नाहीत, त्यांचे काय होणार, संबंधी प्रश्न विचारला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेतला. कल्याण येथील होली क्रॉस हॉस्पिटलला भेट देत कोविड उपचारासंबंधी माहिती घेतली. यावेळी बैठकीला महापालिका आयुक्त, अधिकारी, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवी मुंबई आणि ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती त्या मानाने चांगली आहे. इतर पालिकांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे या पालिकांना उत्तम व्यवस्था निर्माण करण्यासाठी आर्थिक हातभार लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.