राम मंदिराचा विकास करण्यासाठी बड्या कुटुंबानं केली होती विचारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राम मंदिर बांधणीसाठी खर्च किती असेल याचा विचार न्यासाने केला नाही. मात्र, अंदाजे मंदिराच्या आतील बाजूस सुमारे ३०० ते ४०० कोटींचा खर्च येऊ शकतो. तर मंदिराच्या बाहेरच्या (प्रकोटाचा) विकासासाठी अंदाजे अकराशे कोटी रुपये लागू शकतात. त्याचा खर्च करण्यासाठी एका बड्या कुटूंबाने विचारणा केली होती. पण नाव लागणार नाही असे सांगून तो प्रश्न तिथेच मिटवला, असे श्री. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले.

पुण्यात प्रसार माध्यमांनाशी संवाद साधताना गिरी महाराज यांनी सांगितलं, राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाचे काम मकर संक्राती पासून माघ पौर्णिमेपर्यंत (दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी) केले जाणार आहे. त्यासाठी एक हजार, शंभर आणि दहा रुपयांचे ५०० कोटींचे कुपन छापण्यात आले आहे. या कूपनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातील १० हजार गावात पोहचण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी दोन हजार संत आणि ५० हजारांहून अधिक स्वयंसेवक कार्य करणार आहेत.

केंद्र सरकारकडून या कार्यासाठी निधी देण्यात येणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा करण्यात येईल. या अभियानातंर्गत सुमारे हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.

दरम्यान, राम मंदिर संपूर्ण विश्वाची सांस्कृतिक राजधानी व्हावी, हा हेतू आहे. मुख्य कार्य म्हणजे राम मंदिर निर्माण झाल्यावर हे पूजे अर्चेचे मंदिर न राहता सांस्कृतिक तसेच चेतना जाणणारे केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून अखिल विश्वाचे आहेत, असेही गिरी महाराज यांनी म्हटलं.