आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात ‘मनसे-सेने’त जुंपली, मनसेकडून विकासकामांचा ‘पंचनामा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्यावरून शिवसेना – मनसे यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. प्रेमनगर भागातील एका विकासकामाच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तर केवळ राजकारणासाठी मनसे खोटेनाटे आरोप करत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

वरळी मतदार संघातील शिवसेना नगरसेवक आशिष चेंबुरकर यांच्या प्रेमनगर भागात सार्वजिनक शौचालयाची दुरावस्था झाली आहे. याबाबत दोन महिन्यापूर्वी मनसेने येथे येऊन नागरिकांचे हाल फेसबुकद्वारे मांडले होते. त्यानंतर स्थानिक नगरसेवकांनी दखल घेत शौचालय दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ केला होता. मात्र गेल्या 2 महिन्यापासून येथे कोणतेही काम झाले नाही. आजही शौचालयांना दरवाजे, लाईट नाही, लोकांच्या तक्रारीकडे स्थानिक प्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेचे विभागाध्यक्ष संतोष धुरी यांनी केला. याबाबत त्यांनी फेसबुक लाईव्ह करत ही समस्या मांडली. मात्र मनसेचे सर्व आरोप चेंबुरकर यांनी फेटाळले आहेत. येथील शौचालयाच्या दुरुस्ती कामाचे ई- टेंडर काढले होते. परंतु रहिवाशांनी दुरुस्तीऐवजी नव्याने शौचालय उभारणी करण्याची मागणी केली. त्यामुळे पुन्हा ई-टेंडरिंगच्या प्रक्रियेतून जावे लागत असल्याने विलंब होत आहे.

परंतू मनसे विकासकामांमध्ये राजकारण करत आहे. खोटेनाटे आरोप लावून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणे हे योग्य नाही. केवळ फेसबुकद्वारे लाईव्ह करून शिवसेनेवर आरोप करण्याचे काम मनसेने बंद करावे, असा टोला चेंबुरकर यांनी मनसेला लगावला आहे.