हवेली तालुक्यातील अनेक कामांना मिळाली गती

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – शिरुर हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक पवार यांनी हवेली तालुक्यात कामासाठी कंबर कसली असून अनेक रखडलेल्या कामांना गती मिळाल्याने नागरिकांच्या अडचणी लवकरच दूर होतील असे चित्र निर्माण झाले आहे. पुणे- अहमदनगर महामार्गावर वाघोली येथे अलिकडे वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य माणूस परेशान झाला. यात प्रामुख्याने वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी फाटा चौक तसेच केसनंद फाटा चौकात कोंडी मोठी असते. या कामाला अनेक अडचणी होत्या त्या दूर झाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

पुणे शहराचा विकास होत असताना शहरालगतच्या गावामध्ये नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. त्यामुळे नागरी सुविधा पुरविण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताण वाढू लागला. शहराच्या पाचही बाजुनी येणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक वाढली. यात पुणे-अहमदनगर महामार्गावर वाघोली येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊ लागली. विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा खुपच गाजला. यावर शिरुर- हवेली विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी हा प्रश्न गांभिर्याने घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना कामाला गती देण्यासंदर्भात सूचना दिल्या.

यावर हा विभाग हरकतीत आला असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. वाघोली येथील अतिक्रमणे दूर करुन रस्ता रुंदीकरण करण्याचे काम चालू आहे. वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी फाटा चौक तसेच केसनंद फाटा चौकातील कामाला गती आल्याने लवकरच वाहतूक कोंडीतून नागरिकांना सुटका होईल अशी आशा आहे.

तसेच लोणीकंद-थेऊरफाटा या (राज्य महामार्ग क्र 58) चे काम अनेक दिवसापासून संथ गतीने चालू आहे. यालाही गती देऊन वेळेत पूर्ण केले जाईल अशी अपेक्षा आहे. थेऊर गावापर्यंत येणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती. मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे अवघड जात होते. यावर आमदार अशोक पवार यांनी संबंधित ठेकेदाराला ताबडतोब दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. या रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवल्याने यापासून थोडा आराम मिळाला आहे. आता या रस्त्याच्या रुंदीकरणाला लवकरच सुरुवात होईल.