बिल्डर देवेन शहा खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

पुणे : पोलीनामा ऑनलाईन
बांधकाम व्यवसायिक देवेन शहा यांचा १३ जानेवारी २०१८ रोजी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीवर मोका लावण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास डेक्कन पोलीस करत होते परंतु आता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

देवेन शहा खून प्रकरणी डेक्कन पोलिसांनी आत्तापर्यंत नितीन दशरथ दांगट (वय 36, रा.वारजे माळवाडी), समीर रजनीकांत सदावर्ते (वय 42, रा.शिवतीर्थनगर, कोथरूड), रवींद्र सदाशिव चोरगे (वय 40,रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता), राहुल चंद्रकांत शिवतारे (वय 45, रा. वडगाव बुद्रुक), सुरेंद्र शामकेर पाल (वय 36, रा. ठाणे), शंकर लक्ष्मण नवले (वय 50, रा. चंदननगर), सुनील ऊर्फ सोनू मदनलालजी राठोर (वय 34, रा. राजेंद्रनगर, मूळ. मध्यप्रदेश) यांना अटक केली आहे.

देवेन शहा खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी डेक्कन पोलिसांनी सहा पथके तयार करुन आरोपींचा शोध घेतला. अटक करण्यात आलेल्या आरोपी पैका सुनील उर्फ सोनू मदनलालजी राठोर याच्या विरुद्ध अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. राठोर याच्यावर संघटीत गुन्हेगारीच्या माध्यमातून शहरातील बांधकाम व्यवसायिकांना धमकावणे, खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी २३ मार्च रोजी त्याच्या गुन्ह्यामध्ये वाढ करत त्याच्यावर मोका लावला.

आत्तापर्यंत डेक्कन पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते. आज या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे आणि सहायक पोलिस आयुक्त समीर शेख हे पुढील तपास करत आहेत.