Video : देवेंद्र फडणवीसांचा महाविकास सरकारवर घणाघाती आरोप, म्हणाले – ‘सल्लागार राज्य बुडवायला निघालेत’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारचे सल्लागार कोण आहेत, ते कळत नाही. जे कुणी आहेत, ते राज्य बुडवायला निघाले आहेत. तसेच सरकारलाही ते बुडवत आहेत. महाराष्ट्रात फक्त पोरखेळ चालला आहे. सरकारने चुकीची कामे करायचे आणि न्यायालयाने चूक दाखवल्यावर न्यायव्यवस्थेला दोष देयचे हे न्यायालयाचा अवमान करणार असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटले.

मेट्रो 3 ची कारशेड आता वांद्रे कुर्ला संकुल येते बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का, या पर्यायाची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बुलेट ट्रेनचं स्टेशन जमीनीच्या आत करायचं ठरवलं तर त्याचा खर्च किमान पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल. आता पाचशे कोटींमध्ये होणाऱ्या डेपोला जर सहा हजार कोटी लागले तर तो भूर्दंड बसेलच पण त्याचा जो वार्षिक देखरेखीचा खर्च आहे तोदेखील जवळपास पाच ते सहा पट अधिक असेल. त्यामुळे हे शक्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच कोणीतरी चुकीचे सल्ले देत असून हा पोरखेळ चालला आहे. मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला.

काय आहे प्रकरण
कांजूरमार्गच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या मुंबई मेट्रो 3 च्या (Mumbai Metro) कारशेड कामाला मुंबई उच्च न्यायालयाने ‘स्टे ऑर्डर’ दिली आहे. यामुळे हा वाद दिर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील (Bandra-kurla complex) बुलेट ट्रेनसाठीच्या (bullet train) प्रस्तावित जागेवर उभारता येते का ? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.