ही तर ‘लबाड’ सरकारची ‘लबाडी’, देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधाऱ्यांवर ‘घणाघात’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी हे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. परंतु जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ टिकणार नाही अशा बोचऱ्या शैलीत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10,000 कोटी रुपये शेतकर्‍यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होते आहे. आज पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली आहे. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकीकडे अवकाळीग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आहे शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

नागपूर जिल्ह्यातील आमडीफाटा आणि धानला येथील सभांमध्ये बोलताना फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. निवडणुकांच्या काळामध्ये अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती, तर 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती. पण आता शेतकर्‍यांना कोणतीही मदत देण्यास सपशेल नकार हे सरकार देत आहे.आमच्या काळात 2001 ते 2017 पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर 2019ची अट टाकून अवकाळीग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू असे सांगून जीआर काढला. ही एका लबाड सरकारने केलेली मोठी लबाडी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून यावेळी फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खातेवाटपावरून सरकारमध्ये धुसपूस सुरु आहे मात्र यासाठी मलईदार खाते कोणाकडे जाणार यावरून वाद सुरु आहे परंतु कृषी खाते कोणाकडे जाणार यावरून मात्र कोणामध्येही स्पर्धा दिसत नाही. तसेच केंद्र सरकारच्या किसान शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/