फडणवीस हे दमदार मुख्यमंत्री : खासदार संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जात, धर्म, पंथ विरहीत केवळ महाराष्ट्राच्या हिताचे, भल्याचे आणि विकासाचे निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत काम केले. मुख्यमंत्री फडणवीस हे दमदार मुख्यमंत्री असून त्यांनी धडाडीने निर्णय घेतलेत. जे काम गेल्या 35 वर्षांत एकाही मराठा मुख्यमंत्र्याला जमले नाही ते मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता केले.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलशिवार योजना, पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ, कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, पुणे, नाागपूर, मुुंबईसह महाराष्ट्रात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्मिती इत्यादी अनेक आघाड्यांवर महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे दमदार व धडाडीचे निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत, असे भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समोर मांडण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आज पुण्यात आले होते. पुण्यातील विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातून ही महाजनादेश यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवाजीनगर येथे खासदार संजय काकडे व मित्र परिवाराच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा, तुतारीच्या जयघोषात संपूर्ण वातावरण पूर्णपणे महाजनादेश यात्रामय झाले होते.

पुणेकरांनी मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाला जनादेश देत पूर्णपणे साथ दिली होती. यावेळी देखील पुणेकर पुन्हा एकदा शंभर टक्के साथ देतील, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रात अतिशय चांगले काम केल्याने विरोधकच शिल्लक राहिला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात रखडलेले प्रकल्प फडणवीस सरकारने मार्गी लावले. त्यामुळे सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. म्हणूनच पुन्हा फडणवीस सरकार महाराष्ट्रात येण्यास काहीच अडचण नाही, असेही खासदार काकडे म्हणाले.

You might also like