ठाकरे सरकारनं केवळ लोकांची फसवणूक केली, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर ‘निशाणा’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली मात्र त्यामागे अनेक अटी देखील लावल्या गेल्या आहेत यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये केवळ ३०० लोकांनाच जेवण मिळत आहे त्यामुळे ठाकरे सरकारने केवळ लोकांची फसवणूक केली आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नंदुरबार येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

नंदुरबार येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका पार पडताहेत त्यासाठी या सभेचे आयोजन केले गेले होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मोदी सरकारने दलित आणि आदिवासी समाजासाठी जे कार्य केले ते आतापर्यंत कोणत्याच सरकारने केले नसल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले. तसेच २०२० मध्ये आरक्षणाची मुदत संपत होती मात्र केवळ मोदी सरकारने आरक्षणाचा वाढीव निर्णय घेतला असल्याचे देखील फडणवीस त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रात ज्याप्रमाणे मोदी सरकार काम करत आहेत त्याचप्रमाणे राज्यात देखील भाजप सरकारने काम केले. केंद्राकडून आलेल्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहचाव्यात यासाठी भाजपची जिल्हा परिषदेमध्ये देखील सत्ता हवी, जिल्हा परिषद जर आपली नसेल तर योजना तुमच्यापर्यंत पोहचणार नाही यासाठी भाजपलाच प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले.

तत्पूर्वी सभेआधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची जळगाव येथे भेट झाली दोनीही नेत्यांमध्ये अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली.

एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्या सोबतच्या चर्चेनंतर दिले स्पष्टीकरण
जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या विषयापलिकडे कोणताही विषय चर्चेला नव्हता. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावं पाठवली होती. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आमची चर्चा झाली. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. असं खडसे यांनी स्पष्ट केलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/