देवेंद्र फडणवीस चषकाच्या सोहळ्यात अजित पवारांचा फोटो झळकल्यानं नव्या चर्चेला ‘उधाण’

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याणमध्ये देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या स्पर्धेप्रमाणेच या स्पर्धेचा बॅनरही चर्चेत आला आहे. कारण या कबड्डी स्पर्धेच्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचेही छायाचित्र झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपचे आ. गणपत गायकवाड हे या देवेंद्र फडणवीस चषक राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजक आहेत. कबड्डी सामन्यांकरिता दिला जाणारा चषक हा फडणवीस यांच्या नावे असल्याने त्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. यावेळी फडणवीस बोलत असताना त्यांच्या मागे असलेल्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी कुजबुज व्हायला सुरूवात झाली.

मात्र, ‘बॅनरवरील अजित पवार यांच्या छायाचित्राचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. पवार हे कबड्डी महासंघाचे अध्यक्ष असल्याने त्यांचे छायाचित्र लावले असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेचे नाट्य सुरु झाले होते, या दरम्यानच फडणवीस व पवार यांनी रात्रीतून युती करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या या शपथविधीमुळे राज्यात राजकीय भूकंप निर्माण झाला होता. मात्र हे सरकार अवघ्या ३ दिवसांत पडले, आणि राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री काही मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात अपेक्षित असून अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद व गृहखाते मिळणार का ? अशी चर्चा रंगू लागली आहे.

त्यात, पवार यांना सिंचन घोटाळ्यात दिली गेलेली क्लीन चिट फडणवीस सरकारनेच दिली होती, असा खुलासा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केला आहे. त्यानंतर आता पवार यांचे छायाचित्र फडणवीस चषकाच्या सोहळ्यात झळकणे हा निव्वळ योगायोग नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/