नागपुरमधील ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून ‘लेटर वॉर’, फडणवीस यांचे गृहमंत्र्यांना पुन्हा पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनीट्रॅपमध्य अडकवण्याचा प्लॅन करणारी ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये ‘लेटर वॉर’ सुरु झालं आहे. आरोपी साहिल सय्यदचे भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र तरी देखील ‘तो आमचा नव्हेच’ असा सूर तिन्ही पक्षाचे नते काढताना दिसत आहेत.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांना शुक्रवारी हनीट्रॅप प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलं आहे. हनीट्रॅप प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हा भजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. गृहमंत्र्यांनी अटक केलेला आरोपी भाजपचा असल्याचे म्हटल्याने भाजप नेत्यांकडून गृहमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे.

फडणवीसांचे पुन्हा पत्र

नागपूरमधल्या एका ऑडिओ क्लिपची तातडीने चौकशी करून कारवाई केली पाहिजे असं पत्र आणि त्यावर तातडीने काढलेला निष्कर्ष आणि त्यामुळे कारवाईच्या निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह हा विषय लिहून फडणवीस यांनी पुन्हा एकदा पत्र लिहलं आहे. नागपूरमधील कथित व्हायरल धन्विफितीची चौकशी करण्याची विनंती मी आपणाला केली आहे. त्या पत्राचे अपेक्षित उत्तर प्राप्त झालेले नाही. तरीही त्याला लेखी उत्तर आपल्या लेटरहेडवर दिल्याचे समाज माध्यमातून समजले.

नागपूरातल्या वृत्तपत्रांनीही आपण पत्र दिल्याचं वृत्त दिले. या पत्रात आरोपीचं नाव आपण नमूद केले आहे. तसचं त्याचे चंद्रशेखर बानवकुळे आणि सुधाकर देशमुख यांच्यासोबत फोटो असल्याने तो भाजपचा कार्यकर्ता आहे, असा निष्कर्ष काढला आहे. हा पक्षातील अंतर्गत वादाचा विषय असल्याचेही आपण या पत्रात नमूद केलं आहे, असे फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.