देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंच्या रूपानं ओबीसी नेतृत्वच संपवलं : मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (सोमवार) केली. तसेच खडसे यांनी आता आरपारची लढाई लढावी, असा सल्ला देखील त्यांनी खडसे यांना दिला आहे. गुलाबराव पाटील आज शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीसांनी ओबीसी नेता संपवला

एकनाथ खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील युद्ध चालते, पुन्हा बंद पडते. हे युद्ध कायम चालत राहिले पाहिजे. एखादी गोष्ट हातात घेतली तर ती धसास लावली पाहिजे. खडसे यांच्या रुपाने फडणवीस यांनी आमच्या उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

तर खडसेंच्या बोलण्याला महत्व राहणार नाही

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आता खडसे यांनी पूर्ण युद्ध लढायला हवे. बोलायचे आणि पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसे यांनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मुंडेच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही ?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, सुशांत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहे. हे योग्य नाही. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का ? तो दारू, सिगारेट घेणारा होता. त्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टी उलगडल्या आहेत. असे असताना मात्र चीनची बातमी दिसत नाही. एकीकडे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत असताना कधी सीआयडी चौकशीची मागणी भाजपने केली नाही. गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता हवी आहे

बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून अशा प्रकारचे राजकारण सुरु आहे. टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरु असल्याचा घणाघाती आरोप गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.

हे बेशरम लोक, आमच्यावर टीका करण्याची लायकी नाही

मुंबईत नैदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करुन भाजप विनाकारण राजकारण करत आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हे सैनिकांविषयी अपमानकारक वक्तव्य केल्यामुळे दीड वर्षे निलंबित होते. भाजपचे हे काही पहिले प्रकरण नाही. हे बेशरम लोक आमच्यावर काय टीका करतील ? त्यांची आमच्यावर टीका करण्याची लायकी नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.