पुण्यात देवेंद्र फडणवीस-अजित पवार येणार एकाच व्यासपीठावर

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जाहीररित्या एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पुण्यात कोविड सेंटरचे उद्घाटन करणार त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. शपथविधीनंतर दोघेही नेते माढ्यात संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्न समारंभात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाला मुंबईत अजित पवार उपस्थित होते.

आता ही तिसरी वेळ आहे, ज्यावेळी दोघे एकत्रित दिसणार आहेत. फडणवीसांच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली होती. आता उद्या पुण्यात या मंचावर दोघे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. कोरोना संकटाच्या काळात पुणेकरांना जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असून सीएसआरच्या माध्यमातून बाणेर येथे सहा मजली कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.