देवेंद्र फडणवीस यांनी केलं ‘इंडिया टुगेदर’ ट्विट; म्हणाले – नवा भारत घडतोय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीच्या वेशीवर गेले दोन महिने केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तर शेतकरी आंदोलनाला अनेक स्तरातून पाठिंबा मिळत आहे. तसेच शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. ह्या गायिकेच्या ट्विटनंतर देशात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती ही पुढे सरसावले आहेत. तर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन या ट्विटर मोहिमेत सहभाग घेतल्याचं दिसून येत आहे.

या दरम्यान, सेलिब्रिटींपासून खेळाडूंपर्यंत आणि कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वचजण इंडिया टुगेदर (India Together) या हॅशटॅगने ट्विट करताना दिसत आहेत. तर सर्वप्रथम अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करुन मत मांडलं आहे. त्यानंतर, भारताचा क्रिकेटपट्टू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपले मत मांडले. त्यानंतर, गाणगोकिळा लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे. तसेच, भाजपा नेतेही ट्विट करुन परराष्ट्र मंत्रालयाची री ओढत असताना दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट इंडिया टुगेदर या हॅशटॅगने ट्विट केल आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कोणताही प्रचार आमच्या देशाचं ऐक्य आणि प्रगतीला अडथळा आणू शकत नाही. नवीन भारत घडविण्याच्या आपल्या वेगवान प्रवासाला याने बाधा येणार नाही, किंवा आव्हान देऊ शकत नाही, भारत एकसंघ असून एकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे, जी प्रत्येक भारतीयांच्या रक्तात आहे, असे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट ?
भारताच्या संसदेने व्यापक चर्चा आणि संवादानंतर कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा करणारे कायदे मंजूर केले आहेत. हा कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता आणि विस्तीर्ण बाजारपेठ मिळू शकेल. ही सुधारणा आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेतीचा मार्ग आहेत. भारतातील काही भागातील शेतकऱ्यांचा छोटा गट या सुधारणांशी सहमत नाही. भारत सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. या प्रयत्नात आतापर्यंत अकरा फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री सहभाग घेत आहेत, केवळ सरकारच नाही,तर पंतप्रधानांकडूनही कृषी कायद्याला स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करताना #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda हा हॅशटॅग वापरला आहे