देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ‘या’ विषयावर झाली चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी सायंकाळी ट्विटरवर ट्विट करून खळबळ उडवून देणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशीरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी अजित पवार यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेबाबत अजित पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी गेले असल्याची चर्चा रंगू लागली.

परंतु अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. राज्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना जाहीर करण्यात आलेली मदत पुरेसी नाही. त्यामुळे अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना द्यावी या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार हे मुख्य सचिव आणि वित्त सचिवांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांमध्ये तब्बल अर्धातास खलबतं झाली. यावेळी या बैठकीला भाजपचे इतरही नेते उपस्थित असल्याचं सांगण्यात येतं. या बैठकीत उद्या कोर्टात होणारी सुनावणी आणि मंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Visit : Policenama.com