छत्रपती संभाजीराजेंच्या ‘त्या’ ट्विटनंतर फडणवीसांची ‘दिलगिरी’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांवर केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दल छत्रपतींचे वंशज व भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडत, त्या ट्विटमुळे माझ्यासह सर्व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे फडणवीसांनी या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती. त्याचवेळी छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणी शिकवण्याची गरज नाही, असेही त्यांनी सुनावलं होते.

छत्रपती संभाजीराजे यांच्या ट्विटनंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटला रिप्लाय देत दिलगिरी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापी यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या रिप्लायमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, काल 6 मे रोजी छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. मात्र, या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत होती. त्यानंतर टीका होताच देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट डिलिट केले आहे.