हिंमत असेल तर मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्याचं सांगा, फडणवीसांचे ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुस्लिम आरक्षणाचा विषय अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे व्यर्थ असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम आरक्षणाला आमचा विरोध असून मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही, हे हिंमतीने सांगा, असं आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दिलं.

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
यावेळी बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेनेने मुस्लिम आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेच्या दोन्ही सभागृहात येऊन मुस्लिमांना आरक्षण देऊ शकत नाही, असं हिंमतीने सांगावं, असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही. सरकार येऊन १०० दिवस झाले तरी आघाडीतील घटक पक्ष एकमेकांना समजावू शकलेले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी
दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवरून आज विरोधकांनी सभात्याग केला. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही २५ हजारांची मदत देण्यात आलेली नाही. त्यांना एक नवा पैसा देण्यात आलेला नाही. त्यांना पैसे कधी देणार? याचं आश्वासनही देण्यात आलेलं नाही. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी फसवी आहे. या कर्जमाफीने शेतकरी कर्जमुक्त सोडाच, साधा चिंतामुक्तही होऊ शकत नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलं आहे, अशी घणाघाती टीकाही फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करणारे आज शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सभागृहात जोरदार घोषणाबाजी आणि सभात्याग
शेतकर्‍यांचे आकडे दिले जात असले तरी या खात्यांची एकूण किती कोटींची कर्जमाफी होणार, हे आकडे सांगायला मात्र राज्य सरकार तयार नाही. या कर्जमाफीवर मंत्र्यांचाच आक्षेप आहे. बच्चू कडू म्हणतात, ही कर्जमाफी एक बुजगावणं आहे. जखम गुडघ्याला आणि उपचार ढोपराला, असेही तेच म्हणतात, असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला. दरम्यान, आज विधानसभेत विरोधकांनी शेतकरी कर्जमुक्तीसह विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.