‘मेधा कुलकर्णींना विचारा चंद्रकांत पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले ?’, जयंत पाटलांचा निशाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघातून भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट केला. त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढवून विजयी झाले. त्यावेळी कुलकर्णी यांना पक्षाकडून योग्य सन्मान दिला जाईल असे सांगितले गेले. पण आता पदवीधर निवडणुकीतदेखील त्यांना तिकीट नाकारले. याबद्दल कुलकर्णी यांनी नाराजीही व्यक्त केली. चंद्रकांत पाटील जिथे जातात तिथे प्रश्न निर्माण करतात. त्यामुळे पाटलांनी पुण्यात येऊन काय प्रश्न निर्माण केले? हे मेधाताई अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील, अशा शब्दामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुढे पाटील म्हणाले की, पुणेकरांचे मन खूप मोठ आहे. ते कोल्हापूराहून इथे आल्यावर आपण त्यांना मोठ्या मनाने स्विकारले. पण ज्या पुणे शहराच्या आणि पदवीधरच्या विकासासाठी ज्या भागातून ते निवडून आले आहेत, त्या भागाचा त्यांनी किती विकास केला, त्यांच्या किती उपयोगी पडले, याचा अभ्यास केला तर त्याचे उत्तर निश्चित नकारात्मक मिळेल. देशात मागील काही वर्षात पदवीधर मतदारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. ते सर्व प्रश्न सोडविण्यासाठी चंद्रकांत पाटील किती आग्रही दिसून आले ? हादेखील एक प्रश्नच आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला हे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये, असे म्हणत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.