’या’ दोन निर्णयांबद्दल ‘विरोधी’पक्ष नेते फडणवीसांनी केलं CM उद्धव ठाकरेंचं ‘जाहीर’ अभिनंदन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. संधी मिळेल त्या-त्या वेळेले फडणवीस जोरदार प्रहार करताना दिसले आहेत. आजही त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर आसूड ओढले. मात्र, या पत्रकार परिषदेत दोन निर्णयांबद्दल उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केल्याने राजकीय क्षेत्रात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्यानिमित्ताने विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

Advt.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) पाठिंबा व एल्गार परिषद प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. फडणवीस म्हणाले, कोरेगाव-भीमा आणि एल्गार हे वेगळे नाही, तपासात देखील हे उघड झाले आहे. तपासाची व्याप्ती वाढल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे. तर सीएएबाबत फडणवीस म्हणाले, जनगणनेचा कायदा कठोर आहे. प्रश्नावली ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे.

मात्र, सीएए आणि भिमा-कोरेगाव-एल्गार प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यामागे राजकारण असल्याचे म्हटले जात आहे. महाआघाडीतील पक्षांमध्ये हेवेदावे निर्माण व्हावेत, याच उद्देशाने फडणवीस यांनी हे अभिनंद केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण हे दोन्ही निर्णय उद्धव ठाकरे यांनी भाजपाला पूरक असे घेतल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापूर्वीही अस्वस्था दिसून आली आहे.