देवेंद्र फडणवीसांची ‘कोरोना’वर मात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 24 ऑक्टोबर रोजी त्यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते म्हणाले होते की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस कार्यरत राहण्यात गेला आहे. पण आता काही दिवस विश्रांती घेतली पाहिजे अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

सेंट जॉर्ज रुग्णालयात देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्लाझ्मा थेरपीनं उपचार करण्यात आले. रविवारी 200 मिली तर सोमवारी सायंकाळी तेवढाच प्लाझ्मा देण्यात आला होता. त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानं त्यांना काही स्टेरॉईड्स आणि रेमडेसीव्हरही देण्यात आले होते.