‘… तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अर्धे नेते तुरूंगात जातील’ : देवेंद्र फडणवीस

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनच्या काळात खोटी वीजबिले सरकारने दिली आहेत. पण, जी वीज वापरली नाही, त्याचे पैसे भरायचे कसे? तुमच्या भ्रष्टाचारासाठी सरकार हे वसुली करत आहे. मात्र, सरकारची ही पठाणी वसुली टिकू देणार नाही. आज वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भंडाऱ्यात भाजपने मोर्चा काढला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.

तसंच, विदर्भावर महाविकास सरकारचा राग आहे. त्यांनी विदर्भातील उद्योग-धंदे बंद केले आहेत. दुधाचे भाव स्थिर करण्यासाठी आम्ही अनुदान देत होतो. मात्र, साडेबारा कोटी देणार आहोत, असे आश्वासन या महाविकास आघाडीने दिले. पण, यांनी एक रुपयाही फेकून मारला नाही. तसंच, महाविकास आघाडीचे सरकार फक्त माल कमावायला आले आहे. भंडारा जिल्ह्यातील नेते रेती आणि दारूमधून पैसा कमवायला लागले आहेत. त्यांनी धान खरेदी केंद्रावरील व्यवस्था मोडली आहे. धान खरेदी केंद्रावरील भष्टाचार बाहेर आला तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अर्धे नेते तुरुंगात जातील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी महाविकास सरकारवर आरोप करत फडणवीस म्हणाल, “लॉकडाऊनच्या काळात वीजबिलात सुट देऊ, असे सांगितले. लोकांना आतापर्यंत फक्त आश्वासन दिले. आता म्हणतात, की तुम्ही वीज वापरली आहे. त्यामुळे वीजबिल भरावे लागेल. सुट द्यायला फक्त १२-१३ कोटी लागतात. गरिबांना देण्यासाठी इतके पैसे तुमच्याकडे नाहीत आणि मुंबईतील बिल्डरांना पाच कोटी रुपयांची सुट द्यायला या सरकारकडे पैसा आहे. त्यावेळी अख्खं मंत्रिमंडळ एक झाले. एक बुके तुला, एक बुके मला, अशारितीने बुके वाटून घेतले.”