फडणवीसांच्या पोटात का दुखतंय ? पवारांवरील टीकेवर राष्ट्रवादीचा प्रतिहल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  ‘शरद पवार ( Sharad Pawar) सरकारला मार्गदर्शन करत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय?’, असा थेट सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. कर्ज काढणे हे पाप नाही परंतु राज्याचा जीएसटीचा ( GST) हक्काचा २८ हजार कोटीचा परतावा राज्याला न देणे हे निश्चितच पाप आहे. हक्काचा परतावा राज्याला परत मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न करण्यात येणार का ? आणि केले का? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase ) यांनी विचारले आहे. तसेच पाप आणि पुण्याची परिभाषा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना समजावू नये अशा कडक शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले आहे.

गुजरातमध्ये भूकंप झाला त्यावेळी गुजरात व केंद्रात भाजपचे सरकार होते तरीसुद्धा भूकंप पीडितांना मदत करू शकले नाहीत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ( Atal Bihari Vajpayee)यांनी त्यावेळी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शरद पवार यांना केले होते. मग तो सरकारचा नाकर्तेपणा होता का? असा खोचक सवालही महेश तपासे यांच्याकडुन करण्यात आला आहे. देशात अनेक कृषीमंत्री झाले मात्र एकमेवाद्वितीय कृषीमंत्री शरद पवार राहिले आहेत ज्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही तसेच शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi ) करेल असेसुद्धा महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन सोमवारी पाहणी करण्यात आली. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अनेक बाबतीत राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे आणि त्याविरोधात लोकांमध्ये असंतोष वाढत असल्याने शरद पवार यांना सरकारचा बचाव करावा लागत आहे. आता तेवढं एकच काम त्यांच्याकडे आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते. केंद्राची मदत कशाप्रकारे मिळते हे त्यांना चांगलेच माहित आहे. केंद्राचे पथक राज्यात येते, मग राज्याचा अहवाल केंद्राकडे जातो, गृहमंत्री, अर्थमंत्री व कृषीमंत्री एकत्र बसून त्यानुसार मदतीबाबत भूमिका निश्चित करतात. हे सगळं माहित असताना देखील केंद्राकडे बोट का दाखवता? शेतकऱ्यांना ही टोलवाटोलवी नको आहे, अशा टोलासुद्धा फडणवीस यांनी सरकारला लगावला होता.

You might also like