40 हजार कोटी परत पाठवले, ही तर महाराष्ट्रासोबत ‘गद्दारी’ : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीच्या सरकारकडून केंद्र सरकारच्या 40 हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे. यावरून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं म्हणत फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. ‘फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी महाराष्ट्राचे 40 हजार कोटी केंद्रांकडे वळवले? ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे’ , असे राऊत म्हणाले आहेत.

काय म्हणाले अनंतकुमार हेगडे

आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री बनला आणि राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेलं? आमच्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, हा एक प्रश्न सगळेच विचारतात. केंद्र सरकारचा 40 हजार कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील.

त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचं नाटक करण्याचं ठरलं. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर 15 तासांत त्यांनी 40 हजार कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले. ही योजना पूर्वीपासूनच भाजपाने बनवून ठेवली होती. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Visit : policenama.com