फडणवीस यांच्याकडूनच सावरकरांचा अपमान, जयंत पाटलांचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावासाठी आग्रही असणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत केला आहे. जयंत पाटील यांच्या आरोपामुळे भाजपची चांगलीच गोची झाली.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरु आहे. अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून आजच्या दिवसाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून सावरकरांच्या गौरव प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी भाजपने अध्यक्षांकडे केली. कामकाजाला सुरुवात होताच सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्तावावर भाजपची भूमिका मांडीली. त्याला फडणवीस यांनी अनुमोदन दिले.

अनुमोदन देताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकातून सावरकरांबद्दल लिहिलेल्या आक्षेपर्ह लिखाणाचा उल्लेख केला. या मासिकावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र, मासिकातील टिप्पणी वाचून दाखवताना ‘शिदोरी’ मासिकात सावरकरांना ‘बलात्कारी’ असं संबोधण्यात आलं होते. हे सांगताना फडणवीस यांनी ‘बलात्कार’ हा शब्द वारंवार उच्चारला.

यावरून सत्ताधारी बाकावरून जयंत पाटील यांनी त्याला विरोध करत आक्षेप घेतला. महापुरुषांच्या गौरवपर प्रस्तावाची मागणी करण्यास कोणालाच आक्षेप असू शकत नाही. मात्र, तसं करताना विरोधी पक्ष नेत्यांकडून संबंधित महापुरुषांचाच अपमान होत आहे, असे जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.