‘आपला नाकर्तेपणा लपवायचा आणि केंद्राला बोलायचे ही राज्य सरकारची पध्दत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या कोरोना लसीकरणावर आक्षेप घेत टीका केली आहे. तसेच महाराष्ट्राला अपेक्षापेक्षा लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्या आरोपांना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “आपला नाकर्तेपणा लपवायचा आणि केंद्राला बोलायचे ही राज्य सरकारची पद्धत असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. आरोप करण्याची यांना सवय लागली आहे. नियमांनुसारच सर्वाना लसीचे वाटप केल्याचेही फडणवीस म्हणाले.”

एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना टोपे यांनी सांगितले, महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारकडून एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस पुरवण्यात आले. मात्र, राज्याला सतरा ते साडेसतरा लाख डोसची आवश्यकता आहे. आता आपल्याकडे ९ ते ९.५ लाख डोस आले असून, ते कमी आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या व्यक्तीस लस टोचवण्यात येणार आहे, त्या व्यक्तीस पूर्ण डोस द्या अशा सूचना आहेत.

पण, अपेक्षेच्या तुलनेत ५५ टक्के डोस आलेले आहेत. त्यामुळे ८ लाख नागरिकांचे लसीकरण करायचे असताना आम्हाला ५५ टक्के म्हणजेच साधारण ५ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करता येईल. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांत उद्या लस पोहचेल, अशी माहिती टोपे यांनी दिली.